देवला येथे सरकारी जागेवर कचरा टाकला म्हणुन एकाला जबर मारहाण!

जालना: जिल्ह्यातील परतूर तालुक्यात सरकारी जागेत कचरा टाकल्याच्या वादातून मारहाण झाली आहे. सरकारी जागेवर कचरा का टाकला म्हणत दहा ते बारा जणांकडून एकाला बेदम मारहाण करत त्याच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६५ हजारांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार परतूर तालुक्यातील देवला येथे सोमवारी सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी सोमवारी सायंकाळी परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवला येथील उत्तम बापूराव लाटे सोमवारी सकाळी आपल्या घरी असताना गावातीलच शिवाजी लाटे, ज्ञानेश्वर लाटे व इतर गावकऱ्यांनी, तू सरकारी जागेवर कचरा का टाकला? असे म्हणत घरात घुसून उत्तम लाटे यांना मारहाण केली. शिवाजी लाटे याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने उत्तम लाटे यांच्यावर वार केल्याने त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला गंभीर दुखापत झाली आहे. फिर्यादी उत्तम लाटे यांची पत्नी, मुलगा व पुतण्या भांडण सोडवण्यासाठी गेले असता वरील आरोपींनी त्यांना देखील लाठ्या, काठ्याने बेदम मारहाण केली. आरोपी विलास विठ्ठल लाटे, कल्याण भास्कर लाटे आणि राम दिनकर लाटे यांनी उत्तम लाटे यांच्या पत्नीच्या अंगावरील ३५ हजार रुपये किमतीचे दागिने आणि घरातील रोख तीस हजार रुपये लांबवले.

दरम्यान या वादातुन मारहाण झाल्याने उत्तम लाटे हे गंभीर जखमी आहेत. तसेच आरोपी शिवाजी रावसाहेब लाटे याने जिवे मारण्याची धमकी दिली. या सरकारी जागेवर कचरा कोणी टाकला याचा शोध पोलिस घेत आहेत, तसेच वाद झाल्यांने फिर्यादी उत्तम लाटे यांच्या फिर्यादीवरून विविध कालामांखाली परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या