औरंगाबाद – दंगलीचा दुसरा बळी; सतरा वर्षीय मुलगा ठार

riot Aurangabad

औरंगाबाद- औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला. शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दगडफेकीत २५ जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शहरातील मोतीकारंजा, शहागंजसह इतर भागात उसळलेल्या दंगलीत एका जेष्ठ नागरिका सह सकाळी साडेनऊ वाजता एका सतरा वर्षीय जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अब्दुल हरीश अब्दुल हारून कादरी (वय 17, रा. जिन्सी) असे मृताचे नाव आहे. जिन्सी भागात दंगलीत तो सापडला व जखमी झाला. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती अत्यंत खालावल्याने त्याला घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. 12) पहाटे दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धावणी मोहल्ल्यातील तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय आहे प्रकरण-

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम गुरुवारपासून सुरु केली आहे. पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. तेव्हा एका गटाने दुसऱ्या एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. यावरुन मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन काल तोडले. याच कारणावरुन दोन गट शुक्रवारी सायंकाळी भिडले. एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात दुकानांबाहेर असणाऱ्या कूलर, सामानासह गाड्यांची तोडफोड, जाळपोळ सुरु केली. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. दोन्ही बाजूकडील सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली.