जालना जिल्ह्यात रस्त्यांच्या कामासाठी मिळणार शंभर कोटींचा निधी

जालना: जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी शंभर कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी नागरीक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने मागणी केली जात होती. या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी १० जानेवारी रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना लेखी पत्र देऊन सदर रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी जालना जिल्ह्यातील रस्ते कामासाठी केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत शंभर कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती सोमवारी देण्यात आली.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या निधीतून राज्य महामार्ग २२३ ते पिरपिंपळगाव – वंजार उम्रद – गोंदेगाव रस्ता दुरूस्ती, रुंदीकरण व पुलाच्या कामासाठी ४ कोटी ९५ लाख ५० हजार रूपये, घनसावंगी – राजेगाव – देवढे हादगाव – माहेरजवळा – येवला – रांजणी रेल्वे स्टेशन रोडपर्यंतच्या रस्ता दुरूस्ती आणि रुंदीकरणासाठी १ कोटी ९९ लाख ६१ हजार रूपये, जांब तांडा – जांब समर्थ, कुंभारपिंपळगाव – तीर्थपुरी रस्त्यावर छोटे पुलांचे बांधकामासाठी १ कोटी ९९ लाख ९० हजार रूपये, चिखली – बदनापूर – नानेगाव रस्ता दुरूस्ती आणि सीडी वर्क्ससाठी ९ कोटी ९५ लाख ८८ हजार रूपये, घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी – उक्कडगाव ते गोपट पिंपळगाव (ता. गेवराई) येथील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ३४ कोटी १० लाख ९९ हजार रूपये, भोकरदन – केदारखेडा रस्ता दुरुस्तीसाठी ३४ कोटी ४३ लाख ८८ हजार रूपये आणि घनसावंगी – ढाकेफळ – कंडारी परतूर ते परतूर रस्ता दुरूस्ती व रुंदीकरणासह छोट्या पुलांच्या बांधकामासाठी ९ कोटी ९१ लाख ५८ हजार रूपये असे एकुण ९७ कोटी ३७ लाख ३४ हजार रूपयांचा निधी केंद्रीयमंत्री गडकरी यांनी मंजूर केला.

दरम्यान केंदीयमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुर केलेल्या रस्त्यांचे कामाला निधी येताच सुरुवात करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात रस्त्याचे पूर्ण स्वरुप बदलणार आहे यामुळे वाहनांची होणारी रहदारी कमी होण्यास मदत होईल. या निधीतून आता या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. केंद्रीयमंत्री दानवे यांनी रस्ता कामासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहे.

महत्वाच्या बातम्या