दहीहंडी फोडतांना १३० पेक्षा जास्त गोविंदा जखमी,एकाचा मृत्यू

blank

टीम महाराष्ट्र देशा- रायगडमध्ये काल दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पाचव्या थरावरून कोसळून गोविंदाचा मृत्यू झाला आहे. अर्जुन खोत (वय २५) असं मृत गोविंदाचं नाव आहे. म्हसळा तालुक्यातील खरसई गावातील ही घटना आहे.

मुंबई आणि उपनगरात दहीहंडी फोडतांना ११९  तर ठाणे इथं १४ गोविंदा जखमी झाले. यातले बहुसंख्य गोविंदा थर लावतांना जखमी झाले. पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरामूळं मुंबईसह अनेक ठिकाणच्या मोठ्या दहिहंड्या रद्द करून, हा निधी पूरग्रस्तांसाठी देण्यात आला.

दरम्यान, काल देशभरात कृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्येही जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.तर दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरामूळं फारसा उत्साह नाही.

जालना शहरात मुंबई इथल्या १२० गोपिका पथकासमवेत हा उत्सव साजरा करण्यात आला. महिलांना प्रेरणा मिळावी, तसंच सामाजिक ऐक्य टिकवून राहावं, या उद्देशानं जालन्यात प्रथमच मोठ्या स्वरुपात या उत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी सांगितलं.