एसटी चालकास मारहाण केल्याप्रकरणी दुचाकीस्वारास अटक

ठाणे : एसटी बसच्या दरवाज्याची धडक लागल्यामुळे एका दुचाकी चालकाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना भिवंडीतील कल्याण नाका येथे घडली होती. या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी दुचाकी चालकास अटक केली आहे. नावीद सलीम सिद्दीकी असे मारहाणप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने रामहरी पांडुरंग साठे (३३) यांना मारहाण केली होती.

कल्याण-भिवंडी मार्गावरील ही प्रवासी बस दुपारच्या वेळी कल्याण नाका येथील आम्रपाली हॉटेलसमोर थांबली होती. त्यावेळी एसटी बसचा दरवाजा उघडल्याने डाव्या बाजूने भरधाव वेगात आलेला दुचाकी चालक नावीद याला त्याची जोरात धडक बसली. यावरून दुचाकी चालक नावीदने एसटी चालकास मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.