‘एकदा या स्मार्ट शहराची यातना बघा ओ’, औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या पोस्टवर नागरिकांच्या भन्नाट प्रतिक्रिया!

औरंगाबाद : खाम नदी पुनरूज्जीवन विकास कामांची शुक्रवारी (दि.११) पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाहणी केली. आत्तापर्यंत झालेल्या कामाचे कौतुक करून खाम नदीकाठ चांगला आणि सुंदर पिकनिक स्पॉट म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र पालकमंत्र्यांच्या या पाहणीचे फोटो औरंगाबाद स्मार्ट सिटीने समाजमाध्यमांवर शेअर करताच यावर कमेंट्सचा एकच पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. यात औरंगाबादकरांनी शहरातील रस्ते, कचरा प्रश्न, ड्रेनेज समस्या यांकडे लक्ष द्या अशी मागणी केली आहे.

पालक मंत्री सुभाष देसाई आज औरंगाबादेत आढावा बैठकीनिमित्त आले असता त्यांनी ऐतिहासिक खाम नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाच्या कामाला भेट दिली. कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी कामाचे कौतुक केले. झालेले काम अभिमान वाटावा असेच आहे. येणाऱ्या काळात खाम नदी पर्यावरण व पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे असून खाम नदीच्या काठावर चांगले आणि सुंदर पिकनिक स्पॉट होईल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या भेटीचे आणि पाहणीचे फोटो औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आले.

मात्र समाजमाध्यमांवर पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या खाम पाहणीचे छायाचित्र आणि औरंगाबाद पालिकेची केलेली स्तुती पाहून जागरुक औरंगाबादकर चांगलेच भडकले. आणि या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला. यात एका नागरिकाने म्हटले आहे, मोती कारंजा, अंगुरीबाग, त्रिमूर्ति चौक ते आकाशवाणी, त्रिमुर्ति चौक ते गजाननमंदीर यांसारखे अनेक चोवीस तास रहदारी व व्यापारी बाजारपेठेतील रस्त्यांचे अक्षरशः बारा वाजले असुन मोठ मोठे चार ते सहा फुटाचे खड्डे पडले आहेत.

एकदा या स्मार्ट शहराची यातना बघा. दुसऱ्या नागरिकाने जिल्हा परिषद मैदानावरील कचऱ्याचे छायाचित्र टाकत मनपाची स्तुती केली आहे. तर आणखी एका नागरिकाने नंदनवन कॉलनीतील रस्त्यावर ड्रेनेजच्या वाहणाऱ्या पाण्याचे छायाचित्र टाकत नंदनवन कॉलनीत नवीन नदीचा उगम, आयुक्तांची प्रगती…खुप सुंदर या शब्दांमध्ये मनपा प्रशासनावर आगपाखड केली आहे. सर्वसामान्य औरंगाबादकरांचा खाम नदी अभियानास पाठिंबा आहेच मात्र शहरातील इतर समस्यांकडे देखील पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

IMP