‘एकेकाळी गुंड, माफिया युपीचे शासन चालवायचे, परंतु आता..’, मोदींचे टीकास्त्र

narendra modi

उत्तर प्रदेश : अनेक दिवसांपासून भाजपाकडून अलिगढ येथील मुस्लीम विद्यपीठाचे (एएमयू) नाव बदलून राजा महेंद्र प्रताप यांच्या नावाने ठेवण्याची मागणी करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर आज(१४ सप्टें.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएमयूच्या बाजूलाच राजा महेंद्र प्रताप यांच्या नावाने तयार होणाऱ्या नवीन विद्यापीठाचे भूमिपूजन केले. तसेच नरेंद्र मोदींनी अलिगढमध्ये उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडोअर आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या प्रस्तावित प्रतिकृतीचे अनावरणही केले.

पुढे त्यांनी याअगोदर उत्तर प्रदेश कसा होता आणि आता कसा आहे याबद्दल देखील भाष्य केले. ते म्हणाले की,’मला आज हे पाहून फार आनंद होतो की ज्या उत्तर प्रदेशला देशातील विकासाच्या मार्गातील अडथळा समजले जायचे तेच उत्तर प्रदेश राज्य आज देशातील अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये देशाचे नेतृत्व करत आहे. पूर्वी येथे कशापद्धतीचे घोटाळे केले जायचे हे उत्तर प्रदेशमधील जनता विसरु शकणार नाही. आज कशाप्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली हे सर्वांनाच माहित आहे. योगी सरकार संपूर्ण निष्ठेने उत्तर प्रदेशच्या विकासाठी काम करत आहे. एक काळ असा होता जेव्हा शासन आणि प्रशासनामध्ये गुंड आणि माफियांची मनमानी चालायची. मात्र आता वसूली करणारे आणि माफियाराज चालवणारे तुरुंगात आहेत,’असेही ते म्हणाले.

दरम्यान, भारतामधील शस्त्रनिर्मिती संदर्भात बोलत असतांना ते म्हणाले की, ‘आज देशच नाही तर संपूर्ण जग हे पाहत आहे की अत्याधुनिक ग्रेनेड आणि रायफल्सपासून लढाऊ विमाने, ड्रोन आणि युद्धनौका भारत स्वत: बनवत आहे. सुरक्षेसंदर्भातील सर्वात मोठा आयात करणारा देश ही आपली ओळख बदलून भारत हीच यंत्रणा निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,’असेही मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या