मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईमुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपत आहे. आता केवळ भाजप राहणार, असे वक्तव्य नड्डा यांनी पाटणा येथे केले आहे. भाजपशी लढण्याची क्षमता अन्य कोणत्याही पक्षात नाही भाजपसोडून सर्व राजकीय पक्ष संपतील, असे नड्डा म्हणाले. यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत टीका केली आहे. “प्रादेशिक पक्ष राज्यांतर्गत अस्मिता जपण्याचे काम करत असतात. त्यांना संपवण्याची आसुरी महत्त्वाकांक्षा भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहीर केली आहे. हा छुपा अजेंडा सत्तेत आल्यापासून भाजप राबवत आहेच. तरी आता उघडपणे बोलण्यापर्यंत भाजप अध्यक्षांची मजल गेली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.
“महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत आहे आणि देशात फक्त भाजप हाच पक्ष शिल्लक राहील”, ही भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच आहे. यातील दुसरा मुद्दा म्हणजे, शिवसेनेचा अंत होत असल्याच्या वक्तव्यावर आता राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. कारण महिन्याभराहून जास्त चाललेल्या सत्तानाट्यात मुख्यमंत्री व त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांनी वारंवार आम्हीच खरी शिवसेना असा गजर माध्यमांमधून आणि न्यायालयीन प्रक्रियेतही चालवला आहे,” असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबूक पोस्टमध्ये म्हटले, “मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा निषेध करत आपल्या पक्षाची अस्मिता जपण्यासाठी भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत ते आता दाखवणार का? अन्यथा मूग गिळून गप्प बसायचे असेल तर आम्ही शिवसेनेच्या रक्षणासाठी बाहेर पडलो, आम्हाला सत्तेचा मोह नाही, अशी दुटप्पी भूमिका तरी जनतेसमोर मांडणे त्यांनी थांबवावे.”
काय म्हणाले होते जेपी नड्डा?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा म्हणाले की, आपली विचारधारेमुळे भविष्यात भाजप हा एकमेव राजकीय पक्ष उरणार आहे. बाकी सर्व काही मिटून जाईल. विचारसरणीच्या अभावामुळे आज भाजपच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष नाही. विरोधकांनी प्रयत्न केले तरी त्यांना आमच्यापर्यंत पोहोचायला 40 वर्षे लागतील. नड्डा रविवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 16 जिल्ह्यांतील भाजपच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आणि सात जिल्ह्यांतील नवीन कार्यालयाची पायाभरणी करत होते. यावेळी त्यांनी हे विधान केले.
काँग्रेस देशातून उखडत आहे – जेपी नड्डा
जेपी नड्डा म्हणाले की, “संपूर्ण देशात घराणेशाहीविरुद्धची लढाई हे भाजपसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. भाजपने सुरुवातीपासूनच विचारधारा बाळगली आहे. काँग्रेस देशातून उखडत आहे. आपले पंतप्रधान UN मध्ये गेल्यावरही दक्षिणेतील कवीने लिहिलेल्या कवितांचे उदाहरण द्यायला विसरत नाहीत. आपल्या विचारसरणीच्या बळावर आपण त्या दक्षिणेकडील राज्यांमध्येही कमळ फुलवू.”
भाजप हा विकासाचा समानार्थी-
देशातील अनेक राज्ये, काश्मीर, पंजाब, हरियाणा, यूपी, बिहार, बंगाल, हैदराबाद, तेलंगणा, महाराष्ट्र यांचा उल्लेख करून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की, येथे एकाच कुटुंबाचे किंवा एकाच व्यक्तीचे सरकार आहे. काँग्रेसही भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे. कुटुंबवादाशी लढायचे असेल, तर प्रजासत्ताक देणाऱ्या या बिहारच्या भूमीचे स्मरण करावे लागेल. भाजप हा विकासाचा समानार्थी असून गरीब आणि शोषितांचा पक्ष आहे, हा विचार जनतेपर्यंत पोहोचवावा लागेल.
महत्वाच्या बातम्या :
- Udhav Thackeray। संजयचा मला अभिमान, राऊतांच्या ईडी अटकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
- Uddhav Thackeray | “आमची वेळ येईल तेव्हा…” राऊतांच्या अटकेवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Uddhav Thackeray । भाजपचा वंश तरी नेमका कोणता? नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा पलटवार
- Sanjay Raut | मोठी बातमी! संजय राऊत यांना ४ दिवसाची ईडी कोठडी
- Aaditya Thackeray | दोन लोकांच्या जम्बो मंत्रिमंडळात मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण तेच समजत नाहीये – आदित्य ठाकरे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<