धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर दत्तामामा म्हणाले…

सोलापूर:- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत हे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाला याची सर्व माहिती आहे, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता पडताळल्यानंतर दूध का दूध, पानी का पानी होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. हा धनंजय मुंडे यांचा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. इतिहासात असे अनेक दाखले सापडतील, असे मत राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले आहे.

तसेच विरोधी पक्षनेता आणि राजकारणी म्हणून धनंजय मुंडे यांचे कार्य मोठे आहे. मी छोटा माणूस आहे. धनंजय मुंडे हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यावर मी अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, या प्रकरणाची सतत्या पडतळल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असे भरणे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या