औरंगाबाद मनपा निवडणूकीच्या तोंडावर भूमिपूजनाचे सत्र; शिवसेनेचा विकासकामांचा नुसताच ‘धडाका’!

औरंगाबाद मनपा निवडणूकीच्या तोंडावर भूमिपूजनाचे सत्र; शिवसेनेचा विकासकामांचा नुसताच ‘धडाका’!

eknath shinde

औरंगाबाद : पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधा दर्जेदाररित्या नागरिकांना मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी दिली. मिटमिटा येथील भारत टॉवर ते कोमल नगर रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी मंत्री शिंदे बोलत होते. औरंगाबाद महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून विविध विकासकामांच्या उद्धाटनाचा धडाका लावण्यात आला आहे तर भूमिपूजनाचेही सत्र सुरु झाले आहे.

यावेळी आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, सिद्धांत शिरसाट आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, काँक्रिट रस्ता असल्याने टिकाऊ रस्ता या भागातील नागरिकांना मिळणार आहे. या ठिकाणी अशा रस्त्याची आवश्यकता होतीच. या रस्त्यासह मीरा नगर, सुंदर नगर येथील रस्ता आवश्यक असल्याचे आमदार शिरसाट यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या मागणीचा विचार करत मीरा नगर, सुंदर नगरच्या रस्त्याचा प्रस्ताव सादर करा, त्या रस्त्यासाठीही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे शिंदे म्हणाले.

राज्यशासनाच्या १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचाही या भागाला लाभ होणार असल्याचेही ते म्हणाले. आमदार शिरसाट यांनी मीरा नगर, सुंदर नगर येथील रस्ता आवश्यक असल्याचे सांगतांना पडेगाव, मिटमिटावासीयांच्या विकासाला प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. यापूर्वी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरात विकास कामांचे उद्घाटन केले होते. त्यानंतर आता नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शहरातील सिमेंट कॉंक्रीटीकरण रस्त्याचे उद्घाटन करून घेण्यात आले. त्यामुळे लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या