घराला घरपण देणाऱ्याच्या घरापुढेच कामगारांचा ठिय्या.

वेबटीम-   घराला घरपण देणाऱ्या पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी      यांच्या मागची घरघर काही थांबण्याच नाव घेत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत            सापडलेल्या डीएसके यांच्या अडचणीत आता अजूनच भर पडत आहे.

फेब्रुवारीपासून डीएसके ग्रुपमध्ये काम करणाऱ्या सुमारे 1400 कामगारांचे पगार न झाल्याने कामगार  चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी डी.एस के च्या  चतुश्रुंगी येथील घरासमोर  गुरुवारी सकाळी ठिय्या मांडत आंदोलन केले. काही कामगारांना अर्धाच पगार दिला जात असून बहुतांश जणांचेे पूर्ण पगारच रखडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. “आम्ही जगायचे तरी कसे व खायचे तरी काय?” असा सवाल कामगार  विचारताना दिसत आहेत.

डीएसके यांनी आम्हाला वारंवार गोड बोलून मी पैसे बुडवणार नाही अशी आश्वासने  दिली. मात्र आजतागायत त्यांनी दिलेला शब्द कधीच पाळला नसून यामुळे आम्हाला त्यांच्या घरावर मोर्चा नेऊन ठाण मांडल्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असे डीएसके टोयोटा मध्ये काम करणार् कामगाराने   सांगितले. दरम्यान, अनेक ठेवीदारांनी त्यांच्या लाखोंच्या ठेवी डीएसके यांच्याकडे अत्यंत विश्वासाने ठेवल्या होत्या. त्यांना त्यांचे पैसे परत कधी मिळणार हा प्रश्न ठेवीदारांना सध्या पडला आहे. मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणुकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत.