पारनेरच्या प्रकरणावर मुश्रीफ म्हणतात, ‘तेव्हा हे ठरलेच नव्हते….’

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिवसेनेला धक्का देणारे व महाविकास आघाडीतील नाराजीनाट्याला कारणीभूत ठरलेले पारनेर नगर पंचायतीतील पाच नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा माघारीचा निर्णय झाला आहे. या सर्व नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली.

पारनेमधील नगरसेवकांचा राष्ट्रवादीतील प्रवेश आणि पुन्हा माघार यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना समन्वय समिती तयार करण्यात आली. सरकारमधील तिन्ही पक्षांत समन्वय घडवून आणण्याचे काम या समितीचे आहे. मात्र, अशा आपसांत पक्षांतराच्या घटना घडल्यावर काय करायचे, हे त्यावेळी ठरलेच नव्हते. असे काही होईल, हे तेव्हा गृहित धरले नव्हते. पारनेरच्या निमित्ताने हे पुढे आले आहे. आता यावर उपाय केला जाईल, समन्वय समितीच्या बैठकीत अशावेळी काय करायचे त्याचे धोरण ठरविण्यात येईल. कारण भाजपला रोखायचे असेल तर यावरही धोरण ठरवावे लागणार आहे.’

दरम्यान, पारनेरमधील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार नीलेश लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यातील अंतर्गत राजकारणातून तेथील नगर पंचायतीतील पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खुद्द अजित पवारांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला. हे नगरसेवक भाजपच्या वाटेवर होते. ते विरोधी पक्षात जाऊ नये म्हणून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याचा खुलासा आमदार लंके यांनी या प्रकरणावर केला होता. वरिष्ठांशी चर्चेनंतरच हा निर्णय झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. असं असलं तरी या पक्षांतरामुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

राज्यात खांद्याला खांदा लावून सरकार चालवणाऱ्या पक्षांमध्ये सरकार स्थापनेनंतर पहिल्या वर्षातच रंगलेला हा फोडाफोडीचा खेळ चर्चेचा विषय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या घडामोडींमुळं कमालीचे नाराज झाले होते. आमचे फोडलेले नगरसेवक परत करा, असा निरोप ठाकरे यांनी अजित पवारांना दिला होता. त्यानंतर आज महत्त्वूपर्ण घडामोडी घडल्या. या नगरसेवकांना मुंबईत बोलावण्यात आले. तिथं प्रथम पवार आणि नंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर जाण्यास सांगण्यात आले.

कोरोनाशी लढाई एकांगी नको; पालिकांनी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करून घ्यावे – उद्धव ठाकरे

मी डॉक्टर आहे, मला रोहित पवारांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही – सुजय विखे

युजीसी’ने आधीचा निर्णय फिरवला; परीक्षांबाबतचे निर्णय हे कुलगुरूंच्या सहमतीनेच – सामंत

IMP