केरळमध्ये सरसंघचालक भागवत यांना ध्वजारोहणापासून रोखले

पलक्कड: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पलक्कड येथील शाळेत ध्वजारोहण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला. मात्र, भागवत यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष करत ध्वजारोहण केले. जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री ११ वाजता शाळेच्या व्यवस्थापनाला ध्वजारोहण कार्यक्रम कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या हस्ते करु नये, असा आदेश बजावला होता. शिक्षकांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण करावे असेही जिल्हा प्रशासनाने आपल्या आदेशात म्हटले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत भागवत यांनी आज सकाळी ध्वजारोहण केले. दरम्यान, जिल्हाधिका-यांची ही कृती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसासाखी आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. सरकारी मदत मिळणा-या शाळांमध्ये कोणी ध्वजारोहण करावे याबाबत कोणतेच शासकीय नियम नाहीत यामुळे पलक्कड जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला कसलाच अर्थ नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.