३१ डिसेंबरला ‘गोंगाट – गुडबाय २०१७’ युवा पिढी, सामाजिक स्वास्थासाठी हानीकारक

new year celebration

सातारा : सध्या पाश्‍चात्य कुप्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे ३१ डिसेंबरला मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघात, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता ३१ डिसेंबरला जाधववाडी येथे होणारा ‘गोंगाट – गुडबाय २०१७’ हा कार्यक्रम युवा पिढी आणि सामाजिक स्वास्थासाठी हानीकारक ठरू शकतो, असे दिसते.

या कार्यक्रमात पाश्‍चात्त्य विकृतींना प्रोत्साहन देणारे हॅलोवीन थीम, डॉल्बी डिजिटल नाईट, टेन्टमध्ये एकांतात रहाण्याची सोय, टॅटू पार्लर, फटाक्यांची आतषबाजी, टॅक्सीची सुविधा यांसारखे अनेक अपप्रकार होणार आहेत. डॉल्बी नाईट, फटाक्यांची आतिषबाजी यांमुळे आधीच भेडसावत असलेली प्रदूषणाची समस्या गंभीर होणार आहे. टॅटू पार्लरसारख्या प्रकारांमुळे अंगप्रदर्शन आणि त्यायोगे येणा-या विकृतींना रोखणे, प्रशासनासाठीही आव्हान ठरणार आहे.कार्यक्रमाची थीम हॅलोवीन ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ राक्षसांसारखे भेसूर वेष करून धांगडधिंगा केला जाईल.

छत्रपती शिवाची महाराज आणि क्रांतिकारक यांचा वारसा असलेल्या साता-यात असे संस्कृतीहीन कार्यक्रम होणे दुर्दैवी आहे. पाश्‍चात्यांचे अंधानुकरण आणि चंगळवाद पसरवून युवा पिढीस चुकीच्या मार्गास लावणा-या ‘गोंगाट’कार्यक्रमास परवानगी देऊ नये, अशी मागणी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त करण्यात आली.

गोलबाग, राजवाडा या ठिकाणी सायंकाळी ४ वा. समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येऊन विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. गणेशउत्सवात डॉल्बीवर बंदी घालण्यात आली होती. सर्व मंडळांनी त्याचे पालन केले. ३१ डिसेंबरच्या कार्यक्रमांना डॉल्बी लावण्यास शासन अनुमती देणार असेल, तर तो दुटप्पीपणा असेल, अशी भावना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.आंदोलनामध्ये विश्‍व हिंदु परिषदेचे जितेंद्र वाडेकर, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, रणरागिणी शाखेच्या रूपा महाडिक, बजरंग दलाचे मुकुंदराव पंडित, हिंदु महासभेचे धनराज जगताप, श्रीशिवप्रतिष्ठान हिदुस्थानचे अमोल मोरे, शिवसेनेचे अ‍ॅड. शिरीष दिवाकर, रजपूत समितीचे उत्तमसिंह रजपूत यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. वारकरी संप्रदायाचे कृष्णराव क्षीरसागर महाराज, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे आणि सनातन संस्था यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

वायूप्रदूषण करणा-या फटाक्यांवर केवळ दिवाळीतच नाही, तर नाताळ आणि ३१ डिसेंबर च्या काळातही बंदी घाला ! फटाक्यांमुळे वायूप्रदूषण वाढते आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात देहली आणि एनसीआर या भागात फटाके विक्रीवर काही दिवसांसाठी बंदी आणली होती, तसेच अनेक राज्य शासनांनी दिवाळीच्या काळात फटाके उडवण्यावर निर्बंध आणले होते.

महाराष्ट्र शासनाने शाळांतील विद्यार्थींकडून यासंदर्भात शपथग्रहण कार्यकम घेतले. असे अनेक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आले. येत्या २५ डिसेंबरपासून १ जानेवारीपर्यंत चालणार्‍या नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षदिनाच्या निमित्तानेही देशभरात मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात. त्यामुळे शासनाने सर्व दृष्ट्याहानी करणा-या फटाक्यांवर केवळ दिवाळीतच नव्हे, तर ईद, नाताळ, ३१ डिसेंबर यांसह वर्षभरच बंदी आणावी, अशी मागणी रणरागिणी शाखेच्या रुपा महाडिक यांनी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त केली.