सांगलीत २३ ऑगस्टला धान्य दुकानदार, रॉकेल विक्रेत्यांचा मोर्चा

सांगली  : अन्नसुरक्षा कायद्यात तरतूद असलेले महाराष्ट्र राज्य अन्न महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी २३ ऑगस्ट रोजी सांगली येथे रास्तधाव धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेते संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष वसंत अग्रवाल व सांगली जिल्हा अध्यक्ष मुबारक मौलवी यांनी दिली. केंद्र शासनाने अन्नसुरक्षा कायदा करून साडे तीन वर्षे झाली तरी राज्य शासनाने अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. सर्व शिधापत्रिकाधारकांना कायद्यातील तरतुदीनुसार धान्य मिळावे अथवा धान्याची रक्कम शिधापत्रिका धारकांच्या बँक खात्यावर राज्य शासनाने जमा करावी, राज्यात अन्न महामंडळ स्थापन करण्यात यावे, धान्य दुकानदारांना मासिक मानधन मिळावे, गोदामातून दुकानापर्यंत माल पोहोच झाला पाहिजे, अन्न महामंडळावर रास्तभाव धान्य दुकानदारांच्या प्रतिनिधींना घेतले पाहिजे व तामिळनाडू, मेघालय व आंध्र प्रदेश राज्यात रास्तभाव धान्य दुकानदारांना ज्या पध्दतीने दरमहा १५ हजार रूपये मानधन मिळते, त्या पध्दतीने महाराष्ट्रातही मानधन मिळावे आदी मागण्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मागणीसाठी दि. २३ ऑगस्ट रोजी वसंतदादा पाटील मार्केट यार्डातील वसंतदादा पाटील सांस्कृतिक भवनात रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांचा व्यापक मेळावा आयोजित केला आहे. त्यानंतर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर करणार असून या मोर्चात महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेते संघटनेचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे वसंत अग्रवाल व मुबारक मौलवी यांनी सांगितले.