मुंबई : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी(२८नोव्हें.)परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. असे असतानाच डोंबिवलीमध्ये दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका रहिवाशाला कोरोनाचा लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत आलेल्या एका रहिवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली. तसेच या व्यक्तीला झालेल्या कोरोनाचा संसर्ग हा नव्या प्रकारच्या व्हेरिएंटचा तर नाही ना याची तपासणी करण्यासाठी जिनोम सिवेन्सिंग चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आल्याचेही पानपाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, रविवारी केंद्राने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसंदर्भात फेरविचार करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तसेच ‘ओमिक्रॉन’च्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी कोरोना चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या, प्रवाशांची इतिहासनोंद, करोना नियमावलीचे कठोर पालन, अशी चारस्तरीय उपाययोजना लागू करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल