दिनदुबळ्या रुग्णांची सेवा करणाऱ्या ओमप्रकाश शेटे यांचा अभिमान आहे – पंकजा मुंडे

दिंद्रुड / परशुराम लांडे : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी रुग्ण सेवेचा इतिहास रचला आहे. आतापर्यंत त्यांनी राज्यातील लाखो रुग्णांना जीवनदान दिले आहे. ते माझ्या जिल्ह्याचे आहेत याचा मला मोठा अभिमान असल्याचे गौरवोद्गार ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काढले.

दिंद्रुड ता.माजलगाव येथे आयोजित बुलडाणा अर्बन व विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार आर. टी. देशमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे ओमप्रकाश शेटे, राहुल लोणीकर, रमेश आडसकर, मोहन जगताप, बुलडाणा अर्बन चे संचालक आंबेश बियाणी, पंचायत समिती सदस्या सुरेखा ठोंबरे, सरपंच ज्योती अतुल ठोंबरे , विजय गोल्हार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, शेटे यांच्या प्रयत्नांमुळेच या गावाला भरीव विकास निधी मिळाला आहे. आपल्या गावाबद्दल त्यांच्या मनात असलेली ओढ, गावकऱ्यांबाबत असलेली तळमळ मी जवळून पहिली आहे. त्यांच्या आग्रहाखातर मी आज येथे आले असून यापुढेही दिंद्रुडगावासाठी माझ्या खात्याची तिजोरी उघडी ठेवणार आहे.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ओमप्रकाश शेटे म्हणाले की, पंकजा मुंडेंनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे बीड जिल्ह्याचा देशात प्रथम क्रमांक आला आहे. ही या जिल्ह्यातील प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी दिलेल्या बंधाऱ्यामुळे पानमळ्याची ओळख असलेले दिंद्रुड खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होणार आहे. पंकजाताईंचे मला नेहमीच पाठबळ राहिलेले असल्याने मी माझे काम समर्थपणे करू शकतो असेही ओमप्रकाश शेटे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू खांडेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. रमेश गटकळ यांनी केले. आभार बुलडाणा अर्बनचे विभागीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाला दिंद्रुड परिसरातील सर्व सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.