ओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर

टीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच राहील, असे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व मराठी कामगार सेनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सोमवार, १९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे. आझाद मैदान येथून हा मोर्चा निघेल.

ऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये तर प्रति किलोमीटर दर १८ ते २३ रुपये असायला हवे. कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे, अशा विविध मागण्या ओला-उबर चालक-मालकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यासाठी २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला. परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसोबत ओला, उबर चालक संघटनेची बैठक पार पडल्यानंतर बारा दिवसांनंतर संप तात्पुरता स्थगित करण्यात आला. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी मागण्यांवर अंतिम चर्चा करण्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु मागण्यांवर काहीच तोडगा निघाला नसल्याने १७ नोव्हेंबरपासून ओला, उबर चालक संप करणार असल्याचे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सचिव सुनील बोरकर यांनी संपाबरोबरच मंत्रालयावर मोर्चाही काढण्यात येणार असून गुरुवारी पत्रकार परिषदेत आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहिती दिली.