सलाम ‘या’ कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला, आईचे अंत्यसंस्कार आटोपून तात्काळ सेवेत रुजू

संगमनेर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून जनतेचे रक्षण करण्यासाठी अनेक प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स आपले कर्तव्य बजावत आहेत. आपल्या घरचांच्या आधी जनतेच्या संरक्षणासाठी अनेक अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी आपल्या कामाला प्राधान्य देत आहेत. अशातच संगमनेर मधील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची घटना समोर आली आहे.

संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी आपल्या एका कृतीतून राज्यातील जनतेसमोर एक अत्यंत मोठं उदाहरण ठेवलं आहे. दोनच दिवसांपूर्वी शशिकांत यांच्या आईचं निधन झालं. यावेळी शशिकांत हे आपल्या आईचे अंत्यसंस्कार आटोपून आपलं दु:ख बाजूला सारत पुन्हा तात्काळ सेवेत रुजू झाले आहेत. शशिकांत मंगरुळे यांच्या या कर्तव्य दक्षतेचे कौतुक खुद्द महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही   केले आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाही आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावत आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षित नागरिकांसाठी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी इतर प्रशासन देखील कार्यरत आहे. लॉकडाऊन असल्याने सर्व नागरिकांना भाजीपाला, अन्नधान्य आणि अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे काम प्रशासकीय अधिकारी करत आहेत.