अधिकारी ऐकेनात, परिसरात प्रचंड दुर्गंधी! नागरिकांनी ड्रेनेजचा मलबा दिला थेट अधिकाऱ्यांना भेट

औरंगाबाद : ड्रेनेजची साफसफाई केल्यानंतर पडलेला मलबा उचलण्यासाठी विनंत्या केल्या, तक्रारी केल्या मात्र निगरगट्ट प्रशासन काडीमात्र हलले नाही. आठवडाभर परिसरात दुर्गंधी पसरली. त्यानंतर हतबल झालेल्या नागरिकांनी अखेर तोच घाणीचा मलबा एका पिशवीत भरला आणि ती पिशवी थेट गिफ्ट म्हणून दिली ती मनपाच्या अधिकाऱ्यांना. दुर्गंधीने या अधिकाऱ्यांना एसीतही घाम फुटला.

सिडको एन-९, पवन नगर येथील नागरिकांनी वारंवार विनंती करूनही ड्रेनेजचा मलबा महापालिका अधिकारी कर्मचारी उचलत नव्हते त्यामुळे अखेर त्रस्त नागरिकांनी शुक्रवारी अनोखे आंदोलन करत रस्त्यावर पडलेला मलबा थेट प्रभाग कार्यालयात आणून महापालिका अधिकाऱ्यांना भेट म्हणून दिला. या अनोख्या आंदोलनाचा महापालिका प्रशासनाने जबरदस्त धक्का बसला आहे.

पवन नगर भागात असलेल्या गटारीची महापालिका कर्मचाऱ्यांनी नुकतीच स्वच्छता केली मात्र त्यातून निघालेला दुर्गंधीयुक्त मलबा उचलून देण्याकडे त्यांनी साफ साफ दुर्लक्ष केले. मागील आठवडाभरापासून हा मलबा जशाचा तसा रस्त्यावर पडून होता. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रार केली. विनंती केली. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. या मलब्यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी पसरली. सोबतच रोगराई निर्माण होण्याचा धोका देखील वाढला होता. यामुळे परिसरात राहणारे नागरिक त्रस्त झाले.

पहिले सहा दिवस मलबा रस्त्यावर पडून असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली होती. नागरिकांनी विनंती करुनही स्वच्छता करण्यास कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ सुरू केली. घाण, दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती असल्याने येथील सुनील जोशी, विकास शिवणकर, नितीन पाटणी, नितीन आवटी, ललित देशपांडे, राहुल पाटील यांनी रस्त्यावर पडलेला मलबा एका पिशवीत भरला. आणि चक्क ती पिशवी प्रभाग कार्यालय येथील अनेक विभागातील अधिकाऱ्यांना भेट स्वरूपात सादर करीत संताप व्यक्त केला. या प्रकाराने झोन कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला.

महत्त्वाच्या बातम्या