गंगापूर तहसिल कार्यालयात अधिकारी-कर्मचारी गैरहजर, राष्ट्रवादीचे खुर्चीला हार घालत गांधीगिरी स्टाईलने आंदोलन!

गंगापूर : सोमवारी (दि.१९) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गंगापूर तहसील कार्यालयात अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांच्या कामाचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला होता. याठिकाणी ही दररोजचीच परिस्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे याठिकाणी अनोख्या प्रकारे गांधीगिरी करत तहसील कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आणण्यात आला. कार्यालयात सातत्याने गैरहजर राहून जनतेच्या कामांचा खोळंबा करणार्‍या तहसीलदारांच्या खुर्चीला पुष्पहार घालण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक शिरसाठ यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करुन अनोख्या प्रकारे गांधीगिरीचे दर्शन घडवले. ग्रामीण भागातील झिरो तलाठी, झिरो लाईनमन याप्रमाणे माझीही झिरो तहसीलदार म्हणून नियुक्ती करा असे उपरोधिक निवेदन दिले. सोमवारी पहिल्याच दिवशी तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहायक, वाहन चालक, कोतवाल असे जवळपास ३१ पैकी १५ अधिकारी, कर्मचारी कार्यालयात फिरकलेच नाहीत.

तहसील कार्यालयातून देणार येणारी १८९ उत्पन्न प्रमाणपत्रे, १३९ रहिवासी दाखले, १७ वय अधिवास प्रमाणपत्रे, ७ अल्पभूधारक प्रमाणपत्रे यासह महसूल, गौण खनिज, संजय गांधी निराधार योजना यासह शेकडो फाईल सध्या प्रलंबित आहेत. तालुक्यातील जवळपास नव्वद टक्के अधिकारी हे शासनाने नेमून दिलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत. ग्रामीण भागातील तलाठी, लाईनमन गावातील अकुशल इसमाची नेमणूक करण्यात येत आहे. सर्व शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांना मुख्यालयात राहणे सक्तीचे करून संबंधित तहसीलदार व कर्मचारी त्यांच्याविरुद्ध शासनाच्या अध्यादेशानुसार शिस्तभंगाची कारवाई न केल्यास येत्या ९ ऑगस्ट पासून आंदोलन छेडण्याचा इशारा शिरसाठ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

IMP