अकोलेकाटीमधील पशुवैद्यकीय अधिकारी निलंबित

सोलापूर  : अकोलेकाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकऱ्याची मागणी नसतानाही पशुवैद्यकाने दहापट जास्त पैसे घेऊन जातीवंत खिलार गाईला संकरित वळूचे रेतन केले. त्या गाईला संकरित वासरू जन्माला आले. गाईची प्रकृती बिघडली असून, संकरित वासरू अन् आजारी गाईमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याप्रकरणी शाहू लामकाने यांनी लेखी तक्रार केली होती. त्याप्रकरणी वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील पशुधन पर्यवेक्षक मोहन चौधरी यास निलंबित करण्यात आले.

पशुपालक मालकाने यांनी त्याप्रकरणी लेखी तक्रार केली होती. पण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांच्यासह झेडपी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पशुसंवर्धन आयुक्तांकडे त्याप्रकरणी तक्रार केल्यानंतर चौकशीची प्रक्रिया सुरू केली. दोषींना पाठीशी घालत संकरित वासरू गावठी वळूपासून झाल्याचा बनाव रचण्याच्या हालचाली पशुसंवर्धन विभागातर्फे सुरू केल्या. कृषी सभापतींकडून पाठराखण पशुसंवर्धन विभागातील गैरप्रकारांबाबत पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या.

पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांच्यासह दोषींच्या चाैकशीचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन डॉ. पराग यांना पाठीशी घालत इतरांवर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगत सारवासारव केली. पशुसंवर्धन विभागाकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. कारवाई केल्यास विभागाचे कामकाज कसे चालणार? असा प्रश्न उपस्थित करीत पाटील यांनी गैरप्रकारांवर पडदा टाकण्याचा खटाटोप केला.