निवडणूक आयोगाचे कार्यालय हे भाजपच्या मुख्यालयात स्थलांतर करावे : आप

blank

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना दिलेल्या क्लीन चीटवरुन विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या नावाने चांगलाच कांगावा केला आहे. तर निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर देखील विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. त्यातच आता आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाचे कार्यालय हे भाजपच्या मुख्यालयात स्थलांतर केले पाहिजे अशी खवचट टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातील वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे विरोधकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना क्लिन चीट दिली होती. त्यानंतर विरोधकांनी भाजप बरोबर निवडणूक आयोगावर देखील टीका टिप्पणी सुरु केली.

दरम्यान निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवून कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अजूनच निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षपातीपणाने वागत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.