महसूल केसेस निकाली काढण्यात नाशिक अव्वल स्थानी

नाशिक : सन 2007-08 ते जानेवारी 2018 या दहा वर्षात विभागीय अप्पर आयुक्तांकडे प्रलंबित असलेले ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महसुली व राष्ट्रीय महामार्ग लवाद अंतर्गत तब्बल 10 हजार 124 अपिले निकाली काढण्यात आले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून या विभागाने आपल्या कामाचा झपाटा वाढवल्याने राज्यात नाशिक विभागाने अव्वल स्थान मिळवले.शासकीय धोरण राबवण्यासाठी तंत्रज्ञानाचा केलेला पुरेपुर वापर, कर्मचा-यांची सकारात्मकता व विभागीय अप्पर आयुक्त जोतिबा पाटील यांची कार्यक्षमता अशा त्रिसुत्रीमुळे ही किमया साधली आहे. दि. 18 जुलै 2016 रोजी जोतिबा पाटील यांनी विभागीय अप्पर आयुक्त पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर कामकाजाला गती दिल्याने राज्यात नाशिक विभागाला अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. निकाली काढलेली सर्व अपिले शासनाच्या इ-डिसनिक प्रणालीवर नोंदवण्यात आलेले आहेत.

गत दहा वर्षांपासून विभागीय अप्पर आयुक्तांकडे विविध शाखांतील अपिले प्रलंबित असल्याने नागरिकांना या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यामुळे कामाचा खोळंबा वाढला होता. मात्र विभागीय अप्पर आयुक्तांनी गतिमान कामकाजाच्या जोरावर अवघ्या दीड वर्षात या अपिलांचा निपटारा केला. यामध्ये ग्रामपंचायत शाखेतील 2785 पैकी 1621, जिल्हा परिषद कर्मचारी शाखेतील 2805 पैकी 1414 तर महसुली शाखेतील 21321 पैकी 6941 अपिले निकाली काढण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग लवाद अंतर्गत प्रलंबित असलेल्या अपिलांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 विषयी 331 व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 विषयी 148 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत. याशिवाय नव्याने दाखल होणा-या प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करण्याचा संकल्प विभागीय अप्पर आयुक्तांनी केला आहे.