अक्षयतृतीया: दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य

पुणे: अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. मंगलमूर्तींच्या भोवती केलेली आंब्यांच्या आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती आणि स्वराभिषेकातून गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

वैशाख शुद्ध तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतीच्या कामांना सुरुवात करतात.काही ठिकाणी हा सण ‘आखाती’ या नावानेही ओळखला जातो. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य अक्षय म्हणजे कमी न होणारे असते असे मानले जाते. गेली अनेक वर्ष देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून हे आंबे दगडूशेठच्या बाप्पासमोर ठेवले जातात.

यंदा मंगळवारी रात्री उशिरा आंबे मांडण्यास सुरुवात करून बुधवारी पहाटेपर्यंत हे काम पूर्ण केले गेले. त्यानंतर पहाटे ४ ते ६ यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी ८ वाजता गणेश याग संपन्न झाला. भक्तांनी पहाटेपासून बाप्पाच्या दरबारी त्याचे पिवळ्याजर्द आंब्यांच्या मधोमध असणारे मनोहारी रूप डोळ्यात साठवण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती.

You might also like
Comments
Loading...