ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला सत्र न्यायालयाने ३ दिवसांची म्हणजेच १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला आज बुधवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी केतकी चितळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याचबरोबर निखील भामरेनेही शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. आता यालाही ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निखील भामरेच्या ट्विटचा फोटो शेअर करत त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. निखिल भामरेला आज ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला नाशिक कोर्टात आणले असताना ठाणे क्राईम ब्रँचने त्याचा ताबा घेतला आहे. ठाणे पोलिसांकडून निखिल भामरेला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
निखिल भामरे नावाचा एक तरुणाने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्याचे ‘बागलाणकर’ असे युजरनेम होते. जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विटरवरुन शेअर केला होता. आता अकाऊंट डिलीट आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिलं होतं की, “वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचाकाकामाफी_माग.” या ट्विटवरून जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर, ठाणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे विरोधात ठाणे पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –