शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मेहबूब शेख यांच्या तक्रारीवरून २७ जणांवर गुन्हा

मेहबूब शेख

बीड : गेल्या काही महिन्यांपूर्वी एका महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते. त्यावरून शेख यांच्यावर औरंगाबाद पोलिसांत गुन्हाही दाखल आहे. पण मेहबूब शेख आता वेगळ्या प्रकरणांवरून चर्चेत आले आहेत. शेख यांच्या तक्रारीवरून शरद पवार यांच्याविषयी बदनामीकारक लिखाण करून त्यांची प्रतिमा मलिन करणे, त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी फेसबुक आणि ट्विटर वरील २७ अकाउंटवर बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावरील उपचाराच्या बातम्या सर्वत्र प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर काही जणांनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकला. यामुळे माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून फेसबुक आणि ट्विटरवरील २७ खात्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, औरंगाबाद पोलिसांत डिसेंबर २०२० मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी मेहबूब शेख याला पोलीस अटक करत नसल्याने पीडितेने न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी हा एक राजकीय व्यक्ती असून गुन्हा दाखल होवूनही तो आपल्या राजकीय बळाचा वापर करून आपली अटक टाळत आहे. तसेच पोलीस आरोपीस मदत करून पाठीशी घालत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेवून पेालिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर ताशेरे ओढले. तसेच पोलिसांनी केलेला तपास चुकीच्या पद्धतीने झाला असेही नमूद केले.

महत्वाच्या बातम्या

IMP