fbpx

उदयनराजेंच्या वाढदिवशी होणार जंगी कार्यक्रम !

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज ५१ वा वाढदिवस आहे. निमित्ताने आज साताऱ्यात शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्या वाढदिवसासाठी जंगी कार्यक्रमांच्या तयारीला सुरवात झाली आहे.

आजच्या या दिवशी विविध विकासकामांची सुरुवात होणार आहे. त्यात साताऱ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविणे, भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन, पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटर उभारणी प्रारंभ आणि पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमांबरोबरच एका मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या मेळाव्याला किमान लाखभर समर्थक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. परंतु या कार्यक्रमास एकाच वेळी व्यासपीठावर विविध पक्षांचे मान्यवर उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाची निमंत्रणे धाडली असून, ते उपस्थित राहणार आहेत.