हो… मी फुले वाडा बोलतोय

phule wada pune

पुण्यातील गंजपेठेत असणारा फुलेवाडा म्हणजे समतेसाठी लढाणा-या प्रत्येक कार्यकर्त्याचं ऊर्जा केंद्र. याच ठिकाणी एकोणिसाव्या शतकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी इथल्या सामाजिक विषमतेविरुद्ध विद्रोहाची मशाल पेटवली अन् कट्टर सनातनी व्यवस्थेविरुद्ध बंडाचं निषाण फडकवलं. याच विद्रोहाची साक्ष देत ‘समतेची भूमी’ म्हणून

फुलेवाडा आज दिमाखात उभा आहे. याच फुलेवाड्याचं हे मनोगत…

काही दिवसांपूर्वी सहजच म्हणून काही मित्रमंडळींसोबत फुलेवाड्यात गेले. तसं तर कार्यक्रमांच्या निमित्तानं वरचेवर जाणं होतेच. पण, त्या दिवशी विशेष असं काही नव्हतं. पण, वेळ होता म्हणून मग आमचे पाय फुलेवाड्याच्या दिशेने वळले. फुलेवाड्यात प्रवेश केला. दुपारची वेळ होती. तिथं गर्दी असण्याचं कारण नव्हतंच. आम्हीच तिघे जण. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही इथल्या सामाजिक चळवळींना ऊर्जेची रसद पुरविणारी ही वास्तू. या वास्तूत प्रवेश करताच इथल्या शांतते बरोबरच इथल्या मातीतला प्रत्येक कण-न्-कण विद्रोहाची साक्ष देत होता.

दरवाजातून आत प्रवेश केला. समोर महात्मा फुलेंचा फोटो पाहून आतल्या खोलीत गेलो. तितक्यात ‘आज, निवांत आलात,’ असे शब्द कानावर पडले. आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. तोच पुन्हा आवाज आला ‘अरे, मी बोलतोय, फुलेवाडा…’ हे ऐकून तर अवाक् झालो. तोच पुन्हा आवाज आला ‘हो मी फुलेवाडा बोलतोय.. बसा. आज तुम्ही निवांत दिसताय. म्हणून म्हटलं माराव्यात गप्पा जरा तुमच्याशी. नेहमी पाहतो तुम्हाला, पण घाईत असता.’ हे शब्द ऐकून आम्ही तर आश्चर्यचकीत झालो होते. एकमेकांकडे पाहत खाली बसलो. म्हटलं ऐकावं जरा.

आम्ही खाली बसताच फुलेवाडा बोलायला लागला, ‘पोरांनो तरुण आहात. बरं वाटतं तुमच्यासारखी तरुण पोरं आली की. मी काय आता म्हातारा झालोय. पण, ज्योतिराव तात्या आणि सावित्रीमाईच्या खूप आठवणींचा खजिना माझ्याजवळ आहे. त्याच बळावर तर उभा आहे, इथं त्यांच्या कार्याची साक्ष देत.’ ‘तर पोरांनो तुम्हाला सांगतो, ज्योतिराव तात्या याच वाड्यात माझ्या अंगाखांद्यावर वाढले आणि याच मातीत इथेच विसावले. अठराव्या शतकातली परिस्थिती तुम्ही जाणताच. प्रचंड मोठी विषमतेची दरी होती. अनिष्ट रूढी-परंपरांनी सगळ्या समाजाला ग्रहण लागले होते. हे ग्रहण सोडण्याचं काम माझ्या ज्योतिराव तात्यांनी केलं. ११ एप्रिल १८२७ ला त्यांचा जन्म झाला. मिशन-यांच्या शाळेत तात्यांनी शिक्षण घेतलं. तात्या लई हुशार. त्यांना इथं सामाजिक विषमता त्रास देत होती. तात्यांना प्रश्न पडत होते. मग तात्यांनी या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला अन् इथल्या सामाजिक विषमतेविरुद्ध बंडाचं निशाण फडकवलं.’

‘तात्यांच्या जोडीला सावित्रीमाई पण होती बरं का. तात्यांनी आधी स्वत:पासूनच सुरवात केली हे
लक्षात घ्या बरं का. लोका सांगे ब्रह्मज्ञान अन् स्वत: कोरडे पाषाण असे कधीच ते वागले नाहीत. आधी त्यांनी सावित्रीमाईला शिकवलं. मग १८४८ ला भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. याच वाड्याचा उंबरठा ओलांडून सावित्रीमार्इंनी स्त्रीशिक्षणासाठी पहिलं पाऊल टाकलं. सोप नव्हतं बरं का पोरांनो हे. लई खस्ता खाल्ल्यात दोघांनी. १८५४ ला या देशातील पहिलं प्रौढ साक्षरता अभियान इथंच सुरू झालं अन् स्त्री-पुरुषांच्या पहिल्या दोन शाळा या वाड्यात सुरू झाल्या बरं का.’

‘इतकंच नाही तर फसलेल्या विधवांची बाळंतपणं अन् त्यांना आधार देणारं केंद्र, अस्पृश्यांना आपल्या घरचा पाण्याचा हौदही इथेच खुला करण्यात आला. यामुळं बाहेरच्यांनीच नाही तर घरच्यांनीही तात्या आणि माईला छळ छळ करत घरातून बाहेर काढलं. पण, दोघांनी माघार घेतली नाही. आपलं काम सुरूच ठेवलं.’ ‘पोरांनो, ही जागा क्रांतीची भूमी आहे हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल मी का हे सांगतोय, पण पोरांनो आज आजूबाजूला पाहतो तेव्हा लक्षात येतं काळ बदलला, पण इथली परिस्थिती नाही बदलली रे. मूठभर लोक सुधारले. काही तात्यांचं नाव घेत मोठे झाले अन् नंतर त्यांनाच विसरले. तर, काहींनी तात्या जातीनं माळी म्हणून जन्माला आले म्हणून जातीचं राजकारण करून
स्वत:चा फायदा करून घ्यायला लागलेत. हे पाहिलं की राग येतो मला. तात्यांनी कधी कोणत्या जातीधर्माचं काम केलं नाही. पण, आज त्यांना जातीत बांधून त्यांचे अनुयायी म्हणून घेणा-यांनी त्यांना लई छोटं बनवल.’

‘तुम्हाला माहीत आहे का? १८७३ साली या इथंच सत्यशोधक धर्माची स्थापना झाली. तृतीय रत्न,
गुलामगिरी, शिवाजी महाराजांचा पोवाडा इथंच लिहिला गेलाय. माणसाला माणूस म्हणून जगता यावं
यासाठी तात्या अन् सावित्रीमाई लढले.’ ‘पण आज तुम्ही काय करता आहात रे? अजूनही तुम्ही जातीबाहेर, धर्माबाहेर पडायला तयार नाही. आजही तुम्ही बाहेरच काय तर घरातही आपल्या आई-बहिणींना सन्मानाची वागणूक द्यायला तयार नाही. अजूनही तुम्ही देवभोळेपणा, अंधश्रद्धा सोडायला तयार नाही. मग तुम्ही माझ्या ज्योतिराव तात्या आणि सावित्रीमार्इंचे वारसदार कसे म्हणून घेता स्वत:ला.

पोरांनो, आज तुमच्याकडं वेळ होता म्हणून मी तुमच्याशी बोललो, पण एक सांगतो या दोघांचा वसा पुढे चालवायची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तेव्हा जाती-धर्माचं राजकारण करू नका. या दोघांनी दाखवलेल्या सत्यधर्माच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करा. अंधश्रद्धांना बळी पडू नका. तात्यांनी लिहिलेल्या शब्दांत सांगायच तर…

सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर
जगामाजी सुख सारे, खास सत्याची ती पोरे
सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार
आहे सत्याचा बा जोर, काढी भंडाचा तो नीर
सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बा राळ
बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी
खरे सुख नटा नोव्हे, सत्य ईशा वर्जु पाहे
ज्योती प्रार्थी सर्व लोका,व्यर्थ डंभा पिटु नका.

– अश्विनी सातव डोके ( मुक्त पत्रकार )