आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी एकवटले ; ‘आरक्षण बचाव’ मोर्चे काढणार

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला 1 डिसेंबर 2018 पासून १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. हे आरक्षण देत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही, असे ओबीसी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात आरक्षण बचाव मोर्चे काढण्याचे ओबीसी संघटनांनी ठरवले आहे. 29 नोव्हेंबर रोजी विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने मंजुरी मिळाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली.

राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर 1 डिसेंबरपासून राज्यभरात मराठा आरक्षण लागू करण्यात आले. परंतु मराठा आरक्षणामुळे इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू शकतो, अशी शक्यतादेखील वर्तवण्यात आली होती. त्यामुळे ओबीसी संघटनांनी आरक्षण बचाव मोर्चे काढण्याचे ठरवले आहे. काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये सोळा ओबीसी संघटनांनी एकत्र येत आरक्षण बचाव या मागणीसाठी जनआंदोलन उभे करण्याची तयारी सुरु केली आहे. यादरम्यान लातूर जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबडेकर आले होते. त्यावेळी त्यांनी आरक्षण बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही आपल्या बरोबर जनआंदोलनात उभे करु, असे आश्वासन आंबेडकरांनी आरक्षण बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

Loading...