मुक्त विद्यापीठ व रोटरी क्लबतर्फे महिलांना रोपवाटिका प्रशिक्षण

नाशिक :-‘मुकापीठानं आमासनी रॉपं कॉन्त्या जातीची, कशी लावायची, त्यांची काळजी कशी घ्याची तसंच भरपूर पिक आणि चांगला पैसा कधी आणि कसा मिळंल याची माहिती दिली. त्यामुळं आता आमीबी आता याच्या त्याच्या श्यातात कामाला जाण्याप्याक्षा आपल्याच श्यातात चांगल्या रॉपान्ची लागवड करून सॉन्यासारखं पिकं घ्याणार’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत सारूळ येथील महिलांनी.

Loading...

ग्रामीण आदिवासी भागातील महिलांना बचत गटाद्वारे स्वंयरोजगाराच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय सुरु करता यावा या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषि विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सारुळ येथील २० महिलांना भाजीपाला रोपवाटिका तंत्रज्ञान या विषयावर नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. मुक्त विद्यापीठाचे कृषि विज्ञान केंद्र ग्राम विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवीत असते. विशेषतः शेतकरी आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उत्कर्ष साधता यावा यासाठी कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून तीन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी यासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या कम्युनिटी सर्व्हिस अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी केल्या जाणाऱ्या कामाचा एक भाग म्हणून या प्रशिक्षणासाठी सहकार्य करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ हेमराज राजपुत, राजाराम पाटील यांनी विशेष सहभाग दिला. या प्रशिक्षणात महिलांना भाजीपाला रोपाचे संपूर्ण मार्गदर्शन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले. बेळगाव ढगा येथील कृषि रोपवाटिकेत महिलांनी तांत्रिक माहिती घेतली. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी भविष्यात या महिलांना तांत्रिक सहकार्य करण्यास केंद्राची मदत देणार असल्याचे सांगितले.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल यांनी या महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहू असे ते म्हणाले. तसेच फळे व भाजीपाल प्रक्रिया, शेळी पालन, शिवनकाम, आरोग्य तपासणी यांसारख्या उपक्रमांसाठी बिनव्याजी पतपुरवठा करणार असल्याचे रोटरीचे माजी अध्यक्ष अनिल सुकेणकर यांनी सांगितले. तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांना रोटरी आणि कृषी विज्ञान केंद्राच्या शास्रज्ञांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. गृहशास्त्र तज्ज्ञ अर्चना देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...