डोंबिविलीतील घटना सुन्न करणारी; आता तरी विशेष अधिवेशन बोलवा- सुधीर मुनगंटीवार

mungantiwar vs uddhav

मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरणात तब्बल 31 जण आरोपी असल्याची माहिती आहे.

यापैकी 22 जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करत व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. डोंबिवलीतील भोपर परिसरात हा प्रकार घडला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

दरम्यान यावर आता भाजपने सरकारला धारेवर धरले असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सर्व प्रकरणामुळे ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले कि, ‘डोंबिवली घटना थरकाप उडवणारी आणि मन सुन्न करणारी आहे.

परंतु तरी देखील हे सरकार अधिवेशन घेणार नाही असं सांगत आहे. महिला अत्याचाराच्या घटना सांगायला सुरुवात केली तर चोवीस तास कमी पडतील. तुमची सत्ता हजार वर्षे ठेवा पण महिला सुरक्षित ठेवा. अशा घटना थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकार बलात्कारासारख्या गंभीर विषयावर चर्चा करत नाही. विशेष पोलीस पथक तयार करून तातडीने अशा प्रकरणाचा निकाल लावला पाहिजे. गुन्हा करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरली पाहिजे. पण यावर उपाययोजना करण्यापेक्षा मुख्यमंत्री राज्यपालांनी फॉरवर्ड केलेल्या निवेदनाला उत्तर देत आहेत. आता डोंबिवलीच्या घटनेनंतर तरी महिलांसाठी विशेष अधिवेशन सरकार घेईल अशी अपेक्षा आहे.’ अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या