‘…आता अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट बघावी लागेल का ?’

anil parab

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.

एनआयए कोर्टासमोर हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील आणखी काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे २ कोटींची मागणी केल्याचा गौप्यस्फोट देखील केला आहे. यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे देखील नाव वाझेने घेतले आहे.

हा धक्कादायक प्रकार समोर येताच भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. ‘अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का ?’ असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

नेमके वाझेने अनिल परब यांच्यावर काय आरोप केलेत ?

जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावलं होतं. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी परब यांनी बोलावलं होतं. सुरूवातीला SBUTबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितलं. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUT ५० कोटी रुपये मागितले होते. मात्र, हे प्रकरण आपल्या हातात नसल्याचं सांगत असमर्थता दर्शवल्याचं वाझे यांनी नमूद केलं आहे.

यासोबतच, जानेवारी २०२१ मध्ये मंत्री अनिल परब यांनी आपल्याला पुन्हा शासकीय बंगल्यावर बोलावलं आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करण्यास सांगितलं. अशा ५० ठेकेदारांकडून २ कोटी रुपये वसूल करण्यास त्यांनी सांगितलं होतं. अज्ञात तक्रारींच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. ठेकेदारांविरोधातील तक्रारींची गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखा अर्थात क्राईम इंटेलिजन्स विभागाने केलेल्या तपासातून काहीही निष्पन्न झालं नाही, असा गौप्यस्फोट सचिन वाझे याने केला आहे.

महत्वाच्या बातम्या