fbpx

आता सरपंचही थेट लोकांमधून निवडला जाणार

वेबटीम : सरपंचाची निवड आता थेट गावकऱ्यांना करता येणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. याआधी सरपंच पदाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमार्फत केली जात होती. मात्र, या  पद्धतीत आता बदल करण्यात आला असून आता थेट गावकरी मंडळी सरपंच कोण होणार हे ठरवणार आहेत

नगराध्यक्षानंतर आता सरपंचही थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार यासंदर्भात वटहुकूम काढणार आहे. त्यानंतर कायदा मंजूर केला जाणार आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये साधारण 8 हजार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हा निर्णय लागू होणार आहे. याचबरोबर सरपंचाच्या अधिकारातही वाढ केली गेली आहे. गावचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकारही सरपंचकडे देण्यात आला आहे. त्यानंतर ग्रामसभा अर्थसंकल्प मंजूर करेल. यासाठी ग्रामसभेचे अधिकारही वाढवण्यात आले आहेत.

सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी 7 वी उत्तीर्ण ही पात्रता ठरवण्यात आली आहे. 1995 नंतर जन्म झालेल्या इच्छुकांना ही अट लागू असेल. 1995 पूर्वी जन्म झालेल्यांना 7 वी उत्तीर्णची अट लागू असणार नाही. यापूर्वी गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये शैक्षणिक पात्रतेचा असा निर्णय यापूर्वीच घेतला गेला आहे.