राफेलप्रकरणी काळंबेरं असल्याची आता जनतेला खात्री झाली आहे – जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : राफेलमध्ये घोटाळा झाला आहे अशी आतापर्यंत चर्चा होती तसेच त्याबद्दल उलटसुलट विधाने आली होती. केंद्राच्या संरक्षणमंत्री जीव तोडून याचा प्रतिवाद करत होत्या. पण आज सगळ्याच गोष्टींवरचा पडदा वर गेला आहे आणि आज खरं काय ते स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ऑलांद यांनी सांगितल्याप्रमाणे भारतासोबतच्या करारामध्ये भारत सरकारने रिलायन्स डिफेन्स या खाजगी कंपनीचाच आग्रह धरला. एचएएलऐवजी यांनाच काम दिले पाहिजे अशी भूमिका मांडली. याचा अर्थ या राफेलच्या करारामध्ये भरपूर घोटाळा झालेला असावा. ५४० कोटींच्या विमानांची किंमत १६५० कोटी एवढी कशी वाढली व एचएएलला बाजूला ढकलण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

एचएएलसारखी ७० वर्षांत कष्टाने उभी केलेल्या या संस्थेबद्दल संरक्षणमंत्री यांनी केलेली विधाने आपण पाहिली तर निश्चितच या देशातील सगळ्याच इन्स्टिट्यूशन मोडून काढण्याची मानसिकता भाजपची आहे हे इथे दिसते, असे ते म्हणाले. राफेल विमान खरेदी प्रकरणी घोटाळा झालेला आहे की नाही व राफेलचे कंत्राट रिलायन्स डिफेन्सला कसे गेले. याविषयी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या विधानाने बरेच काही उघड पडले आहे. भारतीय जनतेला राफेल प्रकरणी काही काळबेरं असल्याची खात्री झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.