fbpx

आता चेहराही ठरणार तुमच्या आधार पडताळणीचा पर्याय

aadhar card

नवी दिल्ली : बायोमेट्रिक पद्धतीने आधार काढत असताना हाताच्या बोटांवरील रेषा अस्पष्ट असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र आता त्यांना ‘यूआयडीएआय’कडून दिलासा मिळणार आहे. १ जुलै २०१८ पासून अश्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरुन नोंदणीकृत आधार कार्डाची पडताळणी केली जाणार आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सध्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांची बुब्बुळं (आयरिस) यांच्या आधारे पडताळणी करतं. मात्र वयोमान किंवा अतिरिक्त कामामुळे ज्यांच्या हाताच्या बोटांवरील रेषा (फिंगरप्रिंट्स) अस्पष्ट झाल्या आहेत, त्यांना ऑथेंटिकेशन करताना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी चेहराही त्यांचा ‘आधार’ ठरणार आहे. चेहरा, बोटांचे ठसे, बुब्बुळं किंवा ओटीपी हे चार पर्यायांपैकी कोणत्याही एका पद्धतीने ऑथेंटिकेशन करता येईल.

सुप्रीम कोर्टात आधार कार्डावर होणाऱ्या सुनावणीच्या अवघ्या २४ तास आधी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आधार कार्डाच्या अनिवार्यतेवर दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.