ऐकावे ते नवलचं ! आदर्श सून होण्यासाठी आता अभ्यासक्रम

books

टीम महाराष्ट्र देशा : विद्यापीठांमधून नेहमीच्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर कौशल्य विकास अभ्यासक्रमांचेही शिक्षण दिले जाते. ज्यामधून विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत कौशल्याच्या आधारावर आपल्या पायावर उभा राहता येईल. मात्र, बनारस हिंदू विद्यापीठाने चक्क मुलींसाठी आदर्श सून बनण्याचे प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम सुरु केला आहे. याबाबत यंग स्किल्ड इंडियाचे सीईओ नीरज श्रीवास्तव यांनी सांगितले की, समाजातील वाढत्या समस्या पाहता अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची गरज आहे. म्हणूनच आदर्श सून बनण्याच्या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

माझी मुलगी माझा अभिमान या अभियानांतर्गत एका संस्थेच्या मदतीने आदर्श सून कशी व्हायचे? याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण तीन महिन्याचे असणार आहे. यात आत्मविश्वास, कौशल्ये, समस्या सोडवणे आणि तणावाची परिस्थिती हाताळणे याशिवाय संगणक आणि फॅशनच्या संदर्भातील इतर गोष्टीही शिकवण्यात येतील.

आदर्श सून होण्यासाठी असलेल्या अभ्यासक्रमाबाबत नीरज श्रीवास्तव यांनी सांगितले की, ही एक सुरुवात असून लवकरच याची प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयआयटी विभागामार्फत आदर्श सून बनण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.