उंदरांचे आता सत्तेच्या सोयीसाठी मांजरात रुपांतर; ही वाघाची मावशी आहे, वाघ नव्हे!- विखे पाटील

uadhav thakare .vikhe patil

मुंबई: माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा समोर आणला होता. तसेच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे तर मंत्रालयातीलच उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केल्याचा दावा खडसेंनी केला होता. हाच मुद्दा पुढे करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत नावाचा उल्लेख न करता शिवसेनेवर तुफान फटकेबाजी केली.

विखे पाटील म्हणाले, उंदरांना मारण्यासाठी राज्यात काही मांजरीही सोडल्या आहेत. या मांजरी ‘विशेष’ आहेत. कारण पूर्वी उंदीर असलेल्यांचे काहींचे रुपांतर आता मांजरीत झाले आहे. या मांजरी अनोख्या आहेत. त्यांनी वाघाचं केवळ कातडे पांघरले आहे. या मांजरींची दोस्ती फक्त ‘पेंग्विन’ सोबत आहे.

विखे पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर शिवसेनेची खिल्ली उडवत म्हणाले, हे उंदीर ‘नाईट लाईफ’ वर फिदा असल्याने फक्त रात्रीच हैदोस घालतात. रुफ टॉप, कमला मिल, मिठी नदीचा मलिदा खाऊन या उंदरांचे आता सत्तेच्या सोयीसाठी मांजरात रुपांतर झाले आहे. ही वाघाची मावशी आहे, वाघ नव्हे!, ही वाघाची मावशी उंदरांना भीती वाटावी म्हणून अधूनमधून ‘म्याँव म्याँव’ करीत फुत्कारत येते आणि सोडून जाण्याच्या धमक्या देते. पण दुधाची वाटी दाखवली की, पुन्हा गप्प होते आणि बिळात जाऊन बसते. आता हे मांजरीचे बीळ कुठे आहे, त्याचा पत्ता मी सांगण्याची गरज नाही. ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे.