खड्डेमय व्हीआयपी रोडवर आता ‘स्मार्ट’ सिग्नल; स्मार्ट सिग्नलच्या प्रकाशात अधिकच ठळक दिसतील खड्डे!

roads

औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसाठी ८१ लाख रुपये खर्च करून पाच इलेक्ट्रिक कार, ७९ लाख रुपये खर्च करुन व्हीआयपी रोडवर २५ स्मार्ट सिग्नल बसवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शहरात मोठ्या प्रमाणावर नागरि समस्या कायम असतांना स्मार्ट सिटी अंतर्गत अत्यावश्यक कामांनाच मंजुरी देण्याची गरज होती. सिडको ते हर्सूल रोडवर असंख्य खड्डे आहेत. मात्र आता स्मार्ट सिग्नलच्या प्रकाशात खड्डे अधिकच उठून आणि ठळक दिसतील.

गेल्या दीड वर्षांपासून औरंगाबाद मनपावर प्रशासकीय राज आहे. कोरोना काळात उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याने शहरात अजूनही अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र आजही शहरातील अनेक रस्ते खड्डयांमध्ये आहेत. उड्डाणपूलांवर खड्डे, रस्त्यांवर खड्डे, उड्डाणपूलांच्या खाली साचलेला कचर, दुर्गंधी, सायकल ट्रॅकची दुरावस्था, शहरातील चौकाचौकांमध्ये साचलेला कचरा अशा अशा अनेक बाबींवर मनपा अपयशी ठरली आहे. यासोबतच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामध्ये अनेक ठिकाणी पूल खचले आहेत. ड्रेनेजलाईनचे नुकसान झाले आहे, अनेक भागांमध्ये तर आख्खे रस्ते वाहून गेले आहेत.

जळगाव रोडवर स्मार्ट सिग्नल प्रकाशमान करतील खड्डे

नगर नाका ते केंब्रीज, सिडको ते हर्सूल, रेल्वेस्टेशन ते हर्सूल रस्त्यांवर २५ ठिकाणी स्मार्ट सिग्नल बसवण्यात येणार आहे. त्यावर ७९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. जळगाव रोडवर सिडको ते हर्सूलपर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे झालेले आहेत. आता या रस्त्यावर स्मार्ट सिग्नल बसणार म्हणजे या स्मार्ट सिग्नलच्या प्रकाशात खड्डे अधिकच उठून आणि ठळक दिसतील. जेणेकरून अपघात होण्यापासून नागरिकांचे संरक्षण होईल. आधी रस्ता नीट करण्याएेवजी, रस्त्याची दुरुस्ती करण्याएेवजी स्मार्ट सिटीअंतर्गत अशाप्रकारे स्मार्ट गोष्टींवर पैशांची उधळपट्टी सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

नागरिकांच्या हिताचे निर्णय पंचतारांकीत हॉटेलमध्ये

स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक होणार याविषयी नेहमी स्मार्ट सिटीकडून माहिती दिली जाते. मात्र यावेळी कुठलीही माहिती देण्यात आली नाही. तसेच बैठका डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातील सभागृहात घेतल्या जातात. मात्र यावेळी नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या