शिवसेनेवर केलेली टीका सोमय्यांना भोवली; ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी

टीम महाराष्ट्र देशा – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून सातत्याने विरोध होत होता. या विरोधाची गंभीर दखल घेत भाजपने सोमय्या यांचा या मतदारसंघातून पत्ता कट केला आहे. आता ईशान्य मुंबईतून भाजप- सेनेचा उमेदवार म्हणून भाजपच्या मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मध्यंतरी शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरु असताना सोमय्या यांनी सेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. पुढे राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सेनेसोबत जुळवून घेतले मात्र सोमय्या यांच्या आरोपांमुळे दुखावलेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांना टोकाचा विरोध केला. अखेर तोंडघशी पडलेल्या सोमय्या यांचं तिकीट कापले गेले. शिवसेना भाजपच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संसदीय समितीनं हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जागावाटपात ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे असला तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मर्जीशिवाय येथे उमेदवार देता येणार नाही. याची कल्पना भाजपला असल्यामुळे शिवसेनेच्या विरोधात किरीट सोमय्या यांना उमेदवारी देणे भाजपला शक्य नव्हते अशी देखील माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सोमय्या यांनी जोरदार प्रयत्न केले. पण मातोश्रीवरून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. सोमय्या यांनी भाजपमधील शिवसेनेच्या मित्रांकडून मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.