स्वयंपाक, धुणीभांडी, स्वच्छता, यांसारख्या असंघटीत क्षत्रातील कामगारांना मिळणार आर्थिक सहाय्य

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील असंघटीत कामगारांची माहिती श्रम मंत्रालय आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मागवली आहे. स्वयंपाक, धुणीभांडी, स्वच्छता, झाडूकाम आणि चालक या कामगारांना ‘पंतप्रधान श्रमयोगी मानधन’ या पेन्शन स्कीममधून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी या सर्व कामगारांची माहिती चार एप्रिलपर्यंत विहित नमुन्यात द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिव यांना केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत गृहनिर्माण संस्थांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ यांचे कार्यालय आणि ‘सहकार दरबार’ 14 एप्रिलपर्यंत बंद राहील, अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी दिली.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या अनेक लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेता राज्यसरकार या कामगारांना पंतप्रधान श्रमयोगी मानधन’ या पेन्शन स्कीममधून आर्थिक सहाय्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी आपत्कालीन परिस्थितीत गृहनिर्माण संस्थांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक सहाय्य करावे,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.