आधी दानवे आणि आता कुमारस्वामींनी केले सैन्याचा अपमान करणारे लाजिरवाणे वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सैन्याचा अपमान केल्याची घटना ताजी असताना आता कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी देखील सैनिकांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. ज्यांना खायला मिळत नाही, असे लोक सैन्यात भर्ती होतात असं वादग्रस्त वक्तव्य कुमारस्वामी यांनी केलं आहे.

सोलापुरात बोलताना रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात मोठी चूक केली होती. पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना, पाकिस्तानने देशातील ४० अतिरेकी मारले, असं विधान त्यांनी केलं होतं. या विधानावरून विरोधी पक्षांनीही दानवे लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दानवेंचा याबाबतच व्हिडीओ शेअर करुन त्यांना हेच का भाजपाचे बेगडी देशप्रेम? असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. परंतु आपण चुकल्याचे दानवे यांना समजताच त्यांनी लगेच सावरत पाकिस्तानने देशातील सैनिकांना मारले असे सांगितले. हा वाद संपण्याच्या आतच आता कुमारस्वामी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओत कुमारस्वामी कन्नड भाषेत असं म्हणत आहेत की, ज्यांना खाण्यासाठी काहीही मिळत नाही, असे लोक सैन्यात भर्ती होतात.दरम्यान, भाजपने कुमारस्वामी यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले आहे. कुमारस्वामी यांना माहीत असायला हवं की लोक देशप्रेम म्हणून सैन्यात भर्ती होतात. तुम्ही तुमच्या मुलाला लोकसभा निवडणुकीत लढवण्यापेक्षा सैन्यात का नाही पाठवत? जेव्हा तुम्ही असं कराल, तेव्हा तुम्हाला सैनिक म्हणजे काय ते कळेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कुमारस्वामी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, कुमारस्वामी यांनी शहीद जवानांचा अपमान केल्याची तीव्र भावना नेटकरी व्यक्त करताहेत.