आता राष्ट्रवादीत संग्राम जगतापांच्या शब्दाला किंमत नाही ? नगरच्या बैठकीत जगतापांना डावललं

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईत बैठकांवर बैठका सुरु आहेत. आज राष्ट्रवादीची अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी चर्चा झाली. मात्र नगरची चर्चा असूनही राष्ट्रवादीने स्थानिक आमदार संग्राम जगताप यांना आमंत्रणच दिलं नाही.

नगर जिल्ह्यातील सर्व प्रतिनधी चर्चेला उपस्थित असताना, संग्राम जगताप यांची गैरहजेरी लक्ष वेधून घेणारी होती. नगर महापालिकेत संग्राम जगताप यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठींबा दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला संग्राम जगताप यांना आमंत्रित केलं नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर लोकसभा मतदारसंघासाठी तीन नावांवर चर्चा झाली. यामध्ये माजी आमदार दादाभाऊ कळमकर, नरेंद्र घुले पाटील आणि प्रतापराव ढाकणे ही नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली. एकीकडे राष्ट्रवादीने तीन नावं निश्चित केली असली, तरी काँग्रेसही या जागेसाठी इच्छुक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा 48 पैकी 40 जागांचा तिढा सुटला आहे. मात्र 8 जागांचा तिढा कायम आहे, यामध्ये नगरच्या जागेचाही समावेश आहे.