‘पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आलीये!’, आठवलेंनी दिले राज्यात सत्ता स्थापनेचे निमंत्रण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. सुमारे ५० मिनिटे या दोन नेत्यांत चर्चा झाली. पवार यांच्या मते या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, केंद्रातील स्वतंत्र सहकार खाते, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे मानण्यात येत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर असताना अचानक या दोन नेत्यांच्या झालेल्या भेटीमुळे राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर रिपाईंचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादीने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा आणि भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करावी, असे आठवलेंनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

आठवले म्हणाले, ‘पवारांनी आपला निर्णय बदलावा अशी माझी त्यांना विनंती आहे. राज्यात शिवसेनेला त्यांनी दिलेला पाठिंबा काढून घ्यावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शरद पवारांविरोधात वारंवार विधानं करत आहेत. त्यामुळे पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आली आहे.’

महत्त्वाच्या बातम्या