fbpx

आता अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

hallabol

भागवत दाभाडे/ अहमदनगर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे येत्या फेब्रुवारी मध्ये पाच तालुक्यात हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या अध्यखातेखाली राष्ट्रवादी भवन येथे नुकतीच बैठक पार पडली आहे.नगर जिल्ह्यात होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाचे यावेळी नियोजन करण्यात आले आहे.

सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन सुरू करण्यात आले आहे.विदर्भातून या आंदोलनाची सुरवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी सरकार विरोधी आंदोलन करून मोर्चे काढण्यात येते. नगर जिल्ह्यात मात्र पाच ठिकाणी हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या 15 फेब्रुवारी ला श्रीगोंदा येथून आंदोलनाला सुरवात होणार आहे .दुपारी शेवगाव शहरात ,तर सायंकाळी राहुरी येथे हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अकोले येथे तर दुपारी 3 वाजता कोपरगाव शहरात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष घुले यांनी दिली.

राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत नगर जिल्ह्यात पाच तालुक्यात मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,खा.सुप्रियाताई सुळे,विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे ,जेष्ठ नेते मधुकर पिचड, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, माजी अर्थ मंत्री जयंत पाटील,महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे,अल्पसंख्याक चे गफ्फर मलिक,सामाजिक न्याय विभागाचे, जयदेव गायकवाड, युवती प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील ,अजिंक्य राणा ,ईश्वर बाळबुधे आदी आंदोलनाला उपस्थित राहणार आहे.

आंदोलनाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकिला माजी आमदार दादाभाऊ कळमकर, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, शिवाजी गाडे, उमेश परहर,रेश्मा आठरे,निर्मला मालपाणी ,काशीनाथ नवले, गणेश गव्हाणे, उपस्थित होते.हल्लाबोल आंदोलनाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांच्या उपस्थितीत 2 फेब्रुवारी पासून बैठका होणार आहेत