आता काँग्रेससोबत कुठल्याही प्रकारे आघाडीसाठी चर्चा करणार नाही : आंबेडकर

Prakash-Ambedkar

अमरावती : एकेक जागा घ्या आणि आमच्या प्रचाराला या, अशी भाषा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केली जात असून आम्हाला गृहित धरले जात आहे. असे असेल तर आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी दिला होता.आता कॉंग्रेसबरोबर युती न झाल्यास आम्ही राज्यात समविचारी पक्षांना सोबत घेऊन पर्यायी आघाडीचा पर्याय देऊ असा थेट इशारा भारीपचे नेते डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला आहे.

अमरावतीमध्ये शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना काँग्रेसला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. आता काँग्रेससोबत कुठल्याही प्रकारे आघाडीसाठी चर्चा करणार नाही, आम्हीच आता काँग्रेससाठी जागा सोडू असं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं आहे. कॉंग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मनी आहे, भाजप हार्ड तर काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी आहे, म्हणून आम्ही काँग्रेससोबत जाणे पसंत केलं होतं, पण काँग्रेसला गरज नसेल तर आम्ही काय करू शकतो हे काँग्रेसला दाखवून देऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून दिल्या जात असलेल्या वागणुकीमुळे त्रस्त खा. राजू शेट्टी, आ. कपिल पाटील हे दोघेही बुधवारी दिल्लीत होते. काँग्रेस आणि भाजपा या दोघांनाही पर्याय ठरू शकेल, अशी आघाडी करण्याच्या हालचाली सुरू असून त्या दृष्टीने त्यांनी दिल्लीत काही गाठीभेटी घेतल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.