आता गाठा अवघ्या चार तासात पुणे; मध्य रेल्वेचे पथक उद्या शहरात

Aurngabad Railway staion

औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रलंबीत रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगाबाद-नगर-पुणे या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी मध्य रेल्वेचे पथक सोमवारी शहरात दाखल होणार आहे. हे पथक तीन दिवसांत गंगापूर, नेवासा, शनिशिंगणापूर येथेही सर्वेक्षण करणार आहे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली आहे.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मराठवाड्यातील रेल्वेसाठी कोणातीही तरतुद नव्हती मात्र मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा करत मागणी केली होती. या मागणीला अनुसरून सोमवारी १ मार्च रोजी मध्य रेल्वेचा पथक हे शहरात तीन दिवसासाठी शहरात असणार आहे. हे पथक अहमदनगर, नेवासा तसेच शनिशिंगणापूर येथेही जाणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांसंबंधी माहिती देऊन गती देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

हा मार्ग पुर्णत्वास गेला तर या मार्गामुळे जालना, शेंद्रा, चिकलठाणा, औरंगाबाद रेल्वेस्टेशन, वाळूज, सुपा, पुणे या औद्योगिक वसाहती जोडल्या जातील. यातुन लाखो रोजगार उपलब्ध होईल. औरंगाबाद-पुणे सर्वेक्षणासाठी मध्य रेल्वेला पत्र पाठवले होते. त्याला प्रतिसाद मिळाला. शंभर वर्षांपासून लालफितीत अडकलेल्या जालना – खामगाव रेल्वेमार्ग सर्वेक्षणाचेही आदेश निघाले आहेत. सध्या औरंगाबादेतून पुण्याला जाण्यासाठी रेल्वे आधी मनमाडला जाऊन परत मागे वळते. त्यात सात तास खर्ची पडतात. नवीन मार्ग अमलात आला तर चार तासांत पुणे गाठता येईल, असे दानवे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या