आता महाविद्यालये देखील सुरु होणार; उदय सामंत यांनी दिली माहिती

आता महाविद्यालये देखील सुरु होणार; उदय सामंत यांनी दिली माहिती

uday samant

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ठाकरे सरकारने बऱ्यापैकी निर्बंध कायम ठेवले होते. शाळा, महाविद्यालये, मंदिरे, चित्रपटगृह, नाट्यगृह हे बंद ठेवण्यात आले होते. आता गणेशोत्सव काळानंतर देखील कोरोना स्थिती आटोक्यात असल्याने ठाकरे सरकारने अनेक गोष्टी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा येत्या ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. तर, मंदिरे आणि सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी खुली केली जाणार आहेत. दुसरीकडे, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे देखील ऑक्टोबर महिन्यात खुली केली जाणार आहेत. आता उच्च शिक्षणाची महाविद्यालये मात्र अद्यापही बंद असून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

याबाबत आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. ‘राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी त्यांच्या अंर्तगत असलेल्या भागातील/जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती कशी आहे याबाबत येत्या ८ दिवसांमध्ये शासनाला अहवाल द्यावा, अशी सूचना मी केली आहे. तो अहवाल टास्क फोर्स समोर सादर केला जाईल. टास्क फोर्सशी चर्चा करून महाविद्यालये/कॉलेजेस सुरु करण्याबाबतच्या अटी-नियम याबाबतचा निर्णय घेतला जाईल. महाविद्यालये लवकरात लवकर सुरु करावेत यासाठी आमची तयारी आहे,’ असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या