fbpx

मुंबई पोलिसांच्या डोक्यावर दिसणार ‘कॅप’

mumbai police new cap

वेब टीम:- कायम ऑन ड्यूटी असलेले मुंबई पोलिसांचा लुक थोड़ा चेंज होणार आहे. पोलिस परिधान करत असलेली टोपी आता कॅप होणार आहे. बंदोबस्त, दंगल किंवा अन्य आपत्कालीन स्थितीत पळताना पोलिसांच्या टोप्या डोक्यावरून घसरतात. ही घसरगुंडी थांबविण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढवली असून या टोपीची जागा आता ‘फिट बसणारी कॅप’ घेणार आहे.

मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलच्या डोक्यावर निळी-पिवळी टोपी सध्या दिसते, मात्र या टोपीबाबत अधिकाऱयांकडे अनेक तक्रारी येत होत्या. एखाद्या आरोपीला पकडताना, बंदोबस्ताच्या वेळी किंवा इतर आंदोलने वगैरे पांगविताना पोलिसांना डोक्यावरील टोपी सांभाळावी लागते. डोक्याच्या आकारानुसार ती फिट बसत नसल्याने ती वारंवार खाली पडते. त्यामुळे कॉन्स्टेबलाच्या या तक्रारीची दखल पोलीस आयुक्तांनी घेतली.

प्रत्येकाच्या डोक्यात फिट बसणारी नव्या स्पोर्टी लूकची कॅप आता पोलिसांच्या वर्दीसोबत दिसेल. या कॅपचा वापर मरीन ड्राइव्ह, मंत्रालय अशा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यावर अधिकृतपणे संपूर्ण पोलीस दलात या कॅपचा वापर सुरू केला जाणार आहे.

कसा असेल कॅपचा लुक.?
मॉडर्न लूक असलेली ही कॅप निळ्या रंगाची आहे. त्यावर एका बाजूला मराठीत तर दुसऱ्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘मुंबई पोलीस’ लिहिण्यात आले आहे. पुढच्या बाजूला मुंबई पोलिसांचा लोगो पिवळ्या रंगात आहे. कॅपच्या पुढील भागात निळा आणि पिवळा पट्टा मारण्यात आल्याने ती अधिक आकर्षक दिसते.