भाजपला मत देऊ नका; सिनेक्षेत्रातील कलाकारांनीही केला भाजप विरोधात एल्गार

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा – भाजप सरकारवर विरोधीपक्षांकडून सतत टीकाकरण सुरु असते. २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यावर अन्य राजकीय पक्षांनी भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आता तर सिनेक्षेत्रातील कलाकारांनीही भाजप विरोधात आता एल्गार केला आहे. त्यांनी भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे.

देशातील १०० हून अधिक फिल्ममेकर्सनी भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्ममेकर्स एकत्र आले. आणि त्यांनी हे आवाहन केल आहे. या संदर्भात त्यांनी एक निवेदनदेखील जारी केलं आहे.

भाजप सरकारने गेल्या चार वर्षात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळपेची केली आहे. असा आरोप या सर्व फिल्ममेकर्सनी केला आहे. शिवाय शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, समाजात मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ वाढवणे, सेन्सॉरशिपच्या नावाखाली उगाच होणारी गळपेची अशा अनेक मुद्यांवरून तसेच देशात उगाच युद्धाचं वातावरण तयार करणं, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक संस्था नेस्तनाबूत करणे, देशात विज्ञानविरोधी वातावरण तयार करणे, ज्या व्यक्तींचा कला, संस्कृती आणि विज्ञानाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना महत्त्वाच्या पदावर बसवणे अशी या विरोधाची महत्वाची कारणं आहेत.

सरकारच्या अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. असा आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे. त्यामुळे भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे. असं या कलाकारांचं म्हणणं आहे.